Desh

न्यायालयाबाहेर थरारनाट्य; भाजपा आमदाराच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ

By PCB Author

July 15, 2019

लखनऊ, दि. १५ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये भाजपा आमदाराच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. मात्र काही वेळातच मुलगी न्यायालयात हजर झाल्याने ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले. साक्षी मिश्रा ही बरेलीमधील भाजपा आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी काही दिवसांपुर्वी तिने एक व्हिडीओ शेअर करत वडिलांपासून आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत असून सर्वांचेच याकडे लक्ष लागले आहे. यामुळेच जेव्हा साक्षी मिश्रा आणि तिच्या पतीचे अपहरण झाल्याचे वृत्त आले तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली होती.

साक्षी मिश्राने गेल्या गुरुवारी अजितेश कुमार याच्याशी लग्न केले आहे. पण अजितेश दलित असल्याने लग्नाला विरोध होत असल्याचा साक्षी मिश्राचा आरोप आहे. लग्न केल्यापासूनच साक्षी मिश्रा आपल्या पतीसोबत अज्ञात ठिकाणी लपून राहत आहे. काही दिवसांपुर्वी दोघांनी व्हिडीओ शेअर करत जीवाला धोका असून पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अलाहाबाद न्यायालयाबाहेर अजितेश याला काहीजणांनी मारहाण केली. दोघेही सुरक्षेची मागणी करण्यासाठी न्यायालयात गेले होते. साक्षी आणि अजितेश यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त अजितेश याला मारहाण करण्यात आली. ते लोक कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सिद्ध झाले असून यासाठीच ते पोलीस सुरक्षा मागत होते.

याआधी न्यायालयात उपस्थित काही साक्षीदारांना शस्त्राचा धाक दाखवत एका दांपत्याचे अपहरण झाल्याची माहिती दिली होती. दांपत्य न्यायालयाबाहेर तीन क्रमांक गेटवर वाट पाहत उभे होते. यावेळी एक काळी एसयुव्ही आली आणि दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करुन घेऊन गेले.

अजितेश कुमारचे वडील हरिश कुमार यांनीही साक्षी आणि मुलगा कोठे आहे याची कल्पना नसल्याचे सांगितले होते. जीवाच्या भीतीने आपणही बरेली सोडले असल्याचे त्यांनी म्हटले होते. पोलिसांनीही आपल्याला त्यांचा ठावठिकाणा माहित नसल्याचे सांगितले होते. दरम्यान भाजपा आमदार राजेश मिश्रा यांनी मुलगी आता प्रौढ असून आपला निर्णय घेण्यात समर्थ असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी कोणतीही धमकी दिली नसल्याचेही म्हटले होते.