न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय   

0
367

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – आता न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याची सुरूवात सर्वोच्च न्यायालयातून  होणार आहे, यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आज (बुधवारी) सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत ऐतिहासिक निकाल दिला आहे.

घटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान थेट प्रसारण झाले पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका  ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी  दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे न्यायालयाने  सांगितले.

दरम्यान, सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयातील सर्व खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयातील सर्वच सुनावणीचे थेट प्रसारण करण्याऐवजी राज्यघटनेशी संबंधित खटल्यांचेच थेट प्रक्षेपण करावे आणि याची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाच्या  कोर्ट रुम क्रमांक १ पासून करावी, असे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी म्हटले होते.