Bhosari

न्यायालयाच्या आदेशाला डावलून जागेत अतिक्रमण; गुन्हा दाखल

By PCB Author

October 20, 2021

भोसरी, दि. २० (पीसीबी) – वादग्रस्त जमिनीबाबत न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत सदर जमिनीमध्ये कुणीही त्रयस्थाने अधिकार प्रस्थापित करू नये, असे आदेश न्यायालयाने दिलेले असताना एकाने त्या जमिनीत शेती करून अतिक्रमण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बो-हाडेवाडी, मोशी येथे घडला.

उदय विठ्ठल तापकीर (वय 40, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुलकरीम अजीजउल्ला खान (वय 41, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 19) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बो-हाडेवाडी मोशी येथील गट नंबर 633 या जमिनीवर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत वादग्रस्त मिळकतीत त्रयस्थ व्यक्तीने अधिकार प्रस्थापित करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरी देखील जमिनीचा मूळ मालक आणि आरोपी उदय तापकीर यांनी त्या जमिनीवर अतिक्रम करून शेती केली. याबाबत फिर्यादी यांनी विचारपूस केली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.