नोटाबंदीचा निर्णय गुन्हा होता, याप्रकरणी संसदेत चर्चा व्हावी – संजय राऊत

0
922

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला.  हा अहवाल  धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच नोटाबंदीचा निर्णय  हा गुन्हा होता. याप्रकरणी संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी  मागणीही राऊत यांनी केली आहे.

नोटाबंदीवरील रिझर्व्ह बँकेचा अहवाल धक्कादायक आहे. अनेक लोकांचा रांगेत उभा राहून मृत्यू झाला. हा मोठा गुन्हा आहे. या अहवालावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

दरम्यान, नोटाबंदीच्या सुमारे दोन वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेने आपला अहवाल प्रसिध्द केला आहे.  ५०० व १००० रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपले आहे. बाद केलेल्या एकूण नोटांपैकी १५.३० लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा बँकेकडे जमा झाल्याचे अहवालात म्हटले होते.