नोकरी लावून देतो म्हणत केली लाखोंची फसवणूक..

0
160

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांनी मिळून 21 लाख 95 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन दोघांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2018 पासून 15 जानेवारी 2020 या कालावधीत घडली.

संतोष सुयस सुतार (रा. शीतलबाग सोसायटी, भोसरी), ज्ञानेश्वर धनवडे (रा. खारघर, नवी मुंबई), विलास गोपाळ गमरे (रा. सिद्धार्थनगर, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय सदानंद शेळके (वय 49, रा. आरडे, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांचा मुलगा संकेत विजय शेळके (वय 24) आणि फिर्यादी यांचा भाचा निलेश पुंडलिक मोरे (वय 24, रा. मोईपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे) यांना नोकरी लावतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शीतलबाग, भोसरी येथे फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. त्यानंतर 12 लाख 95 हजार रुपये बँक खात्यावरून आरोपींनी घेतले. एकूण 21 लाख 95 हजार रुपये घेऊन फिर्यादी यांचा मुलगा आणि भाच्याला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.