Pune

नोकरानेच मारला रांका ज्वेलर्सच्या दीड कोटींच्या दागिन्यांवर डल्ला; आरोपी अटक दागिनेही जप्त

By PCB Author

July 30, 2018

पुणे, दि. ३० (पीसीबी) – पुण्यात रांका ज्वेलर्सच्या दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.  रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यानेच दागिन्यांच्या चोरीचा बनाव रचला होता. अजय होगाडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील झवेरी बाजारातील रांका ज्वेलर्सचा कर्मचारी अजय होगाडे दीड कोटींचे दागिने घेऊन पुण्याला आला होता. परंतु पुणे स्टेशनच्या ६ नंबरच्या प्लॅटफॉर्मशेजारील रिक्षा स्टँडवर आपल्यावर चाकूने वार करत चार चोरट्यांनी दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास केले, अशी तक्रार अजय होगाडेने केली होती. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये चार अज्ञांतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र पोलिसांना तक्रारदार अजय होगाडेविषयी संशय आल्याने त्याची चौकशी केली असताना त्यानेच हा बनाव रचल्याचे पोलिस तपासात समोर आले. कर्जबाजारी झाल्याने वडील आणि भावाच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली. होगाडे कुटुंबावर १२ लाख रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी शरद होगाडे, अन्नू कुमार आणि मारुती बाबू होगाडे यांच्या मदतीने चोरी केल्याचे अजयने सांगितले. घटनेच्या दिवशी आरोपीने स्वत:च्या अंगावर जखमा केल्या आणि भाऊ शरद होगाडे तसेच मित्र अन्नू कुमार यांच्याकडे दागिने मुंबईला पाठवले. तिथून हे दागिने रायगडला पाठवले. हे दागिने एका डब्ब्यात ठेवून रायगड इथल्या टकमक टोकाच्या खाली डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीत पुरले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले.