Pimpri

नेहरुनगर आगारात पीएमपी बस चालकाला लोखंडी झाऱ्याने जबर मारहाण

By PCB Author

February 13, 2019

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – जेवणाची ऑर्डर लवकर न दिल्याचा जाब विचारला म्हणून एका तरुणाने नेहरुनगर आगारातील पीएमपी बसचालकाला लोखंडी झाऱ्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.१२) दुपारी पावनेएकच्या सुमारास नेहरुनगर येथील पीएमपी आगारात घडली.

संजय वसंत म्हस्के (वय ५३, रा. मुरलीधर बापु लांडगे बिल्डींग, रेल्वे गेटखाली, कासारवाडी) असे जखमी बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इम्रान आयुब बेग (वय २७, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय म्हस्के हे पीएमपी बसचे चालक आहेत. मंगळवारी दुपारी पावनेएकच्या सुमारास ते नेहरुनगर येथील पीएमपी आगारातील हॉटेलात जेवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी इम्रान याला जेवणाची ऑर्डर दिली. मात्र इम्रान याला जेवण आणण्यास उशीर झाला. यामुळे संजय यांनी जेवन आणण्यास उशीर का झाला अशी विचारणा इम्रान याच्याकडे केले. या गोष्टीचा राग मनात धरुन इम्रान याने लोखंडी झाऱ्याने संजय यांना जबर मारहाण केली. या घटनेत संजय यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.