‘नेहमी कोहली, रोहित आणि धोनीवर अवलंबून राहून चालणार नाही’, सचिन संतापला

0
415

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – मँचेस्टर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. या पराभवासह भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने सामन्याचे आणि भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे. प्रत्येकवेळा आपण आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. इतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवे.

उपांत्या सामन्यातील महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या संघर्षपूर्ण खेळीचे सचिन तेंडुलकरने कौतुकही केले. परंतु भारतीय फलंदाजी ही नेहमीच आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही असेही सचिनने म्हटले आहे. सचिन म्हणतो, ‘ भारताच्या पराभवामुळे मी निराश झालो आहे. २४० धावांचे लक्ष मोठे नव्हते. पण भारतीय फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. सुरूवातीलाच महत्वाचे तीन बळी घेऊन न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. मधल्या फळीतील फंलदाजांनी आपल्या लौकीकास साजेशी खेळी केली आहे. ‘

आपण रोहित आणि विराट यांनी चांगली सुरुवात करुन पाया मजबूत करावा यासाठी त्यांच्यावर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. धोनीने नेहमीच विजयाने सामना संपवावा ही अपेक्षा सारखी सारखी करणे योग्य नाही. इतर खेळाडूंनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवे होते, असेही तो म्हणाला.