नेमबाज टोकियोत दाखल, सोमवारपासून सरावास प्रारंभ

0
390

टोकियो, दि.१८ (पीसीबी) : देशातील कोविड संकट बाजूला ठेवत कठोर मेहनतीसाठी युरोप गाठणारे भारतीय नेमबाज आज टोकियोत दाखल झाले. भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले असून, या वेळी पदकांची संख्या वाढवण्याबरोबरच पदकाचे रंगही बदलण्याचा विश्वास त्यांच्यात आहे. त्याच इराद्याने ते दाखल झाले असून, त्यांना सोमवारपासून सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नेमबाजीच्या स्पर्धा टोकियोच्या उत्तर पश्चिमेस असलेल्या साईतामा प्रेफेक्युचर येथील असाका शूटिंग रेंजवर होणार आहेत. याच केंद्रावर १९६४ ऑलिंपिक्सच्या स्पर्धा झाल्या होत्या. नेमबाज टोकियोत दाखल झाल्याची माहिती देताना भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया म्हणाले,’सर्व भारतीय नेमबाज सुरक्षित आहेत. ते क्रीडा ग्राममध्ये आहेत. त्यांनी आपल्या खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. सर्व नेमबाज बाहेरुन जपानमध्ये दाखल झाले असल्यामुळे त्यांना विलगीकरणाची अट नाही. त्यांना स्पर्धा केंद्रावर सोमवारपासून (ता. १९) सराव करता येणार आहे.’ जपान विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी उभे असलेले भारतीय नेमबाज

सर्व नेमबाज युरोपमधून प्रवास करून आले आहेत. त्यामुळे जेट लॅगमधून बाहेर पडण्यासाठी त्यांना हा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळेच ते सोमवारपासून सराव सुरू करणार आहेत. अर्थात, त्यापूर्वी ते उद्या रेंजला भेट देणार आहेत. भारतीय संघातील अन्य खेळाडू हे भारतातून येणार असल्यामुळे त्यांना मात्र तीन दिवसाचे कडक विलगीकरण पाळावे लागणार आहे. भारतीय नेमबाज झाग्रेब येथे ८० दिवसांचा सराव करून दाखल झाले आहेत. ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताचे १५ नेमबाज सहभगी होणार आहेत. यामध्ये आठ नेमबाज रायफल, पाच पिस्तूल आणि दोन स्किट प्रकारात सहभागी होतील.

कोविड संकटकाळामुळे निर्बंध लादले जाण्यापूर्वी भारतीय नेमबाजांनी आपले वर्चस् राखले आहे. भारताने २०१९च्या विश्वकरंडक स्पर्धेत अव्वल स्थान भूषविले होते. सहभागी १५ नेमबाजांपैकी भारताचे नऊ नेमबाज हे जागतिक क्रमवारीत पहिल्या तिनांत स्थान मिळवून आहेत. त्यामुळे या वेळी भारतीय नेमबाजांचे वर्चस्व राहणार असा अंदाज बांधला जात आहे.