नेपाळमधील वाटसरूने केला चक्क २४ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विश्वविक्रम

0
460

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. मात्र नेपाळमधील एका वाटसरुने चक्क २४ वेळा हे शिखर सर करण्याचा आगळावेगळा पराक्रम मंगळवारी केला आहे. कामी रिता शेर्पा यांनी मागील आठवड्यात २३ व्यांदा एव्हरेस्ट सर केल्यानंतर मंगळवारी (२१ मे २०१९) पुन्हा एकदा हे शिखर सर केले. असा पराक्रम करणारे ते एकमेव व्यक्ती आहेत.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना रिता यांचे सहकारी मिंगमा शेर्पा यांनी माहिती दिली. ‘मंगळवारी सकाळी रिता यांनी भारतीय पोलीस दलातील गिर्यारोहकांबरोबर एव्हरेस्ट सर करत अनोखा विक्रम केला. आम्हाला रिता यांचा अभिमान वाटतो,’ असे मत मिंगमा यांनी व्यक्त केले. मागील दोन दशकांहून अधिक काळापासून एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाट दाखवण्याचे काम करणाऱ्या रिता यांनी सर्वात आधी १९९४ साली एव्हरेस्टचे ८ हजार ८४८ मीटर उंचीचे शिखर सर केले होते. त्यानंतर मागील २५ वर्षांमध्ये रिता यांनी ३५ हून अधिक वेळा ८ हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर केली आहेत. ४९ वर्षाच्या रिता यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या शिखरांच्या यादीमध्ये पाकिस्तानमधील के टू या शिखराचाही समावेश आहे. के टू हे जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.

मागील वर्षीच रिता यांनी २२ व्यांदा एव्हरेस्ट सर करत २१ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम मोडीत काढला होता. रिता यांच्याआधी हा विक्रम दोन शेर्पांच्या नावे होता. मागील आठवड्यातच २३ व्यांदा शिखर सर करुन आल्यानंतर रिता यांचे बेस कॅम्पवर जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी या हंगामात पुन्हा एकदा एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मी खूप आनंदी असून मला या कामगिरीचा अभिमान आहे. याच हंगामात परत एकदा मी एव्हरेस्टवर जाईन,’ असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.