Maharashtra

नेत्यांचा ओघ असाच सुरु राहिल्यास भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता – जानकर

By PCB Author

August 18, 2019

नागपुर, दि. १८ (पीसीबी) – सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा भाजपा प्रवेश सुरू आहे. हा ओघ असाच सुरू राहिल्यास भविष्यात भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.

पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी शनिवारी नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यात रासपची ताकद वाढत आहे. रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष, २ आमदार आहेत. त्यामुळे पक्षाने भाजपाकडे विधान सभेच्या ५७ जागांची मागणी केल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. २५ ऑगस्टला मुंबईत रासपचा वर्धापन दिन आहे. त्यात सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे.