Pimpri

नृत्यांजलीतील शास्त्रीय नृत्याने रसिक मंत्रमुग्ध

By PCB Author

July 26, 2022

पिंपरी, दि.२६ (पीसीबी) – नृत्यकलामंदिर तर्फे आयोजित केलेल्या ‘नृत्यांजली’ या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात नृत्याविष्कार पाहून उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम शनिवारी (दि.23) निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढवकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार आणि प्राध्यापक डॉक्टर संजीवनी पांडे उपस्थित होते. यावेळी गुरु व नृत्यकलामंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली 75 विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य प्रकारातील विविध कलाविष्कार सादर केले. यात सात वर्षांपुढील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात ही श्लोकम आणि पुष्पांजली या रचनेने झाली विद्यार्थिनींनी नट्ट…मेट्ट..कुदित सरक्क अडवू अशा भरतनाट्यमच्या विविध संरचनात्मक पदन्यास. तसेच अलारीपू.. गणेशगीतम.. जतीस्वरम.. कृष्णवर्णम अशा अभिनय आणि नृत्य यांच्या संगम असलेल्या विविध रचनांचे तालबद्ध सादरीकरण केले. तसेच, भरतनाट्यमच्या मूळ शैलीचा गाभा असलेली एकलशैलीचे सादरीकरण अभिनयाद्वारे पार्वती शंकरावर रुसली आहे आणि गंगेला उच्च स्थान दिल्याबद्दल ती खंत व्यक्त करत आहे असे नृत्य नाट्याने भरलेले पदम, शिवकीर्तनात शंकराचे अद्भुत रूप दाखवणारा पद्ण्यास यात शिवतांडवाचे दर्शन करणारा भाग आणि त्रिपुरा सुराचा वध केल्याचा नृत्य नाट्यात्मक सादरीकरण केले. त्यानंतर अंतीम रचना तिल्लाना ही रचना उत्साह आणि आनंद यांनी प्रेरित रचना जलद गतीमध्ये सादर होते.ही रचना संस्थेच्या बारा विद्यार्थ्यांनी विविध रागांमध्ये गुंफलेली रचना एकत्रपणे सादर केली. मंगलम या प्रार्थनात्मक रचनेने सर्वांचे मंगल व्हावे या भावनेने नमस्कार करून कार्यक्रमाची सांगता झाली

यावेळी प्रास्तावीक मांडताना तेजश्री अडिगे म्हणाल्या की, नृत्य हे संपूर्णतः तुमचा मानसिक आणि शारीरिक विकास करते निर्याश्यमय जीवनास आनंद देते आणि त्यातील बोल पाठांतर तसेच तालाच्या अंगाने मुलांचे बुद्धीचातुर्यही वाढते, असे मत व्यक्त केले. तसेच डॉक्टर संजीवनी पांडे यांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनतीची प्रशंसा करून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला भरभरून दाद दिली.यावेळी संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम ते पाचवे वर्षात कनिष्का आचार्य, आराध्या इनामदार, आर्या पाटील, एंजल पटेल, अपूर्वा जोशी, दूर्वा म्हामूणकर, रिद्धी पाटील, अन्वी भामरे, श्रीनिधी राजगोपाल, आर्या कुलकर्णी, कस्तुरी सुतार, अंशिता बारगळ, अनुष्का बिश्वास, महेश्वरी जोशी, जागृती राणा, शर्वरी खत्री या यश मिळवणाऱ्या विद्यार्थी, कोरोना काळातही नृत्य सातत्य ठेवून भरतनाट्यमचा सहा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी प्रांजल गंगनमले, सुहानी डेरे, अद्विका करजगी, सुजाता गंगनमले, राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केल्याबद्दल विणा भोसले, तन्वी एकदारी, अपूर्वा क्षीरसागर, प्रज्ञा गोरे, कुमुदिनी पाटील या सर्वांना प्रमाणपत्र आणि गौरव चिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमासाठी गायन शिवप्रसाद मृदंग वादन, वेंकटरामन, वायोलिन वादन अजय चंद्रमौळी या वाद्य वृंदाचे सहकार्य लाभले. तर, मार्गदर्शक गुरु तेजश्री अडीगे यांनी पढंत आणि तालवादन केले. नृत्यासाठी सहाय्य संस्कृती मगदूम, कृतिका मीनाक्षी, अनुष्का बैरागी, कुमुदिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी तर आभार अविनाश अडीगे यांनी मानले. तसेच आयोजनाकरिता प्रशांत शिंदे, पंकज ओव्हाळ यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात सहकार्य केले.