नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचे निधन

0
434

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि उपचार सुरु असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांना 20 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं. परंतु मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं.चारकोप इथल्या कब्रस्तानमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 50 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सरमधूनही काम केलं. यानंतर त्यांनी नृत्यदिग्दर्शक बी सोहनलाल यांच्याकडून नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आणि ‘गीता मेरा नाम’ चित्रपटातून नृत्यदिग्दर्शिका म्हणून आपली कारकीर्द घडवली. सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल यांच्यसह अनेक अभिनेत्रींसाठी नृत्य दिगदर्शन केलं होतं.र दशकांच्या करिअरमध्ये सरोज खान यांनी दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजय लीला भंसाली यांच्या ‘देवदास’ चित्रपटात ‘डोला रे डोला’ गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2007 मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ सिनेमातील ‘ये इश्क…’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठीही त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. तसंच खलनायक, चालबाज, हम दिल दे चुके सनम, गुरु याचित्रपटांसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

सरोज खान यांनी अखेरचं नृत्यदिग्दर्शन ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गए’ गाण्यासाठी केलं होतं. या गाण्यात माधुरी दीक्षित होती. करण जोहर निर्मित हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंत बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही.