नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहचलेच नाही – देवेंद्र फडणवीस

0
259

उस्मानाबाद, दि. २० (पीसीबी) : “ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.

“अनेक ठिकाणी खरडून गेली आहे, माती वाहून गेली. तिथे पुढील पीक घेणं अशक्यप्राय आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष योजना हवी. मोबाईलने फोटो काढून पंचनामे उरका आणि तात्काळ मदत करा. जे धनादेश दिले, त्यातील रक्कम ही अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे,” असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करु शकतं. काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्राची मदत कधी मिळते हे शरद पवारांना माहित आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. पण केंद्राआधी राज्य काय मदत करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे सरकारने ठरवावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“कर्ज काढल्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. “महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार कोटी रुपये कर्ज काढलं आहे. आणखी 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येऊ शकतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“राज्याला मदत मिळावी यासाठी मी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. केंद्राकडे मी बोललो काय आणि उद्धव ठाकरे बोललो काय मदत तेवढीच मिळेल. माझ्या बोलण्याने जास्त आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यानं कमी असं होणार नाही. मोदीजींचा तो स्वभाव नाही,” असंही फडणवीस म्हणाले.