नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई आता गप्प का?

0
225

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता मनसे नेते आणि संतोष धुरी आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी गौप्यस्फोट केल्याने नवा ट्विस्ट आला आहे. मात्र यावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्याची प्रतिक्रिया आली नाही. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर हरवल्या आहेत कृपया कुणाला दिसल्यास सांगावं. माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचं रोख बक्षीस, अशी उपरोधिक टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे.

आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे की आपल्या राज्यात जर एखादी महिला तिच्यावर अत्याचार झाला आहे असं सांगत आहे. पोलिसात तक्रार करीत आहे पुरावे देत आहे तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत, असं देसाई म्हणाल्या.