नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे-रामराजे वाद पेटला; पवारांची मध्यस्थी अपयशी

0
420

सातारा, दि. १५ (पीसीबी) – नीरेच्या पाण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून हा वाद शमावा यासाठी शरद पवारांनी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली आहे. उदयनराजे हे चिडून बैठकीत बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण जोरदार तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत काढले होते. तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला होता. दरम्यान, उदयनराजेंवरची तीव्र टीका सहन न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी रामराजेंचा पुतळाही जाळला. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी शरद पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते.

मात्र, बैठक सुरु झाल्यानंतर काही वेळातच चिडलेले उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषीत छत्रपती नाही लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तीक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटलं, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो त्याला घरचा आहेरही म्हटले जाते.