Desh

नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती जप्त; सक्तवसुली संचालनालयाचा दणका

By PCB Author

October 01, 2018

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा चुना  लावून परदेशात पसार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची ६३७ कोटी रुपयांची  संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (सोमवार) जप्त केली आहे. 

हाँगकाँगमधून २२. ६९ कोटी रुपयांचे दागिने व हिरे, दक्षिण मुंबईतील नीरव मोदीच्या बहिणीच्या नावावर असलेले १९.५ कोटी रुपयांचे घर ईडीने ताब्यात घेतले आहे. तसेच नीरव मोदीची बहिण पुर्वी मोदी व तिच्या पतीच्या सिंगापूरमधील कंपनीचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. यात सुमारे ४४ कोटी रुपये आहेत. तसेच अन्य पाच बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.  यात २७८ कोटी रुपये आहेत. याशिवाय लंडनमधील ५६. ९७ कोटी रुपये आणि न्यूयॉर्कमधील २१६ कोटी रुपयांची दोन घरेही जप्त केली आहेत.

घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी, त्याची अमेरिकी पत्नी अमी मोदी, बेल्जियन नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी व मामा मेहुल चोकसी यांच्यासह अन्य कर्मचारी व बँकेचे अधिकारी आरोपी आहेत. मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने विनंती केल्यानंतर इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.