निवडून आलो नाही, तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही; शिवाजीराव आढळराव-पाटलांचे अजित पवारांना प्रतिआव्हान

0
9730

 शिरूर , दि. ७ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची गर्जना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. आता त्यांनी आपला शब्द मागे घेऊ नये. आता मलाही  लिंबू-टिंबूंच्या विरोधात लढण्यापेक्षा अजित पवार यांच्याशी दोन होत करण्याचा आनंद होईल. त्यांचा धुव्वा उडविण्याची क्षमता येथील मतदारांमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज (सोमवार) दिली आहे.   

शिरूरमध्ये एका दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी  रविवारी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारसाहेबांनी  आदेश दिल्यास शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे. आणि येथून निवडून नाही आलो, तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशी गर्जना केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आढळराव यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

आढळराव पुढे म्हणाले की, शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडे  सक्षम  उमेदवार मिळण्याची वानवा आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांतील कोणी तरी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा  सुरू असते. मात्र,  या मतदारसंघात शिवसेनेची ताकद पाहून आणि जनतेचा मला असलेला पाठिंबा पाहून २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनीही येथून लढण्यास टाळले  होते.  त्यामुळे अजित पवार यांनी आता शब्द मागे घेऊ नये. मी त्यांचीच वाट पाहतच आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी  पवारसाहेबांची परवानगी उभे राहण्यासाठी मागितलेली आहे. ते साहेबांची परवानगी कधी पासून घेऊ लागले आहेत, असा खोचक  सवालही आढळराव यांनी यावेळी केला.  निवडून आलो नाही, तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही, असेही प्रतिआव्हान  आढळराव यांनी अजित पवारांना दिले.