निवडणूक निधी उकळण्यासाठीच प्लास्टिक बंदी; राज ठाकरेंचा आरोप

0
824

मुंबई, दि २७ (पीसीबी) – राज्यात २३ जूनपासून लागू झालेल्या प्लास्टिक बंदीला मनसेने विरोध केला आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीपासून राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन पळ काढत असून कोणतीही पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय लोकांंकडून दंड आकारणीला आपला विरोध असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत सरकार प्लास्टिकला पर्याय देत नाही तोपर्यंत नागरिकांनी दंड भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. घाईघाईत लागू केलेल्या या प्लास्टिक बंदीमागे निवडणूक निधी उभारण्याचे राजकारण असावे, असा संशय व्यक्त करत राज यांनी पर्यावरण मंत्र्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषदेत राज म्हणाले, प्लास्टिकने आपले दैनंदिन जीवन व्यापले असून कोणताही पर्याय न देता घेतलेला हा निर्णय अनाठायी आहे. कारवाईबाबत अजूनही लोकांमध्ये संभ्रम आणि भय असून या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी अजून का मौन बाळगले आहे, असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय राज्य सरकारचा आहे की फक्त एका खात्याचा, असा सवाल करत एखाद्या मंत्र्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण होऊ शकत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना लगावला. प्लास्टिकवर बंदी घालायचीच होती तर सगळ्याच प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.