Maharashtra

निवडणूक आयोगाची लग्नपत्रिकांवर करडी नजर

By PCB Author

March 19, 2019

नागपूर, दि. १९ (पीसीबी) – सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारात  उमेदवारांकडून लग्नपत्रिकांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग  लग्नपत्रिकांवर करडी नजर ठेवणार आहे. लग्नपत्रिकांची चौकशी करुन उमेदवाराच्या खर्चात पत्रिकांचा खर्चाचा समावेश होणार आहे, अशी माहिती  नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी  दिली आहे.

उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी  ७० लाख रुपयांची मर्यादा  आहे. यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर  निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येणार आहे.  निवडणुकीतील खर्च लपवण्यासाठी उमेदवारांकडून  वेगवेगळ्या वाटा शोधल्या जातात.  सांगलीतील वाळवामध्ये ३१ मार्च रोजी असलेल्या विवाहाची पत्रिका सध्या चांगलीच  व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाच्या निमंत्रणासोबतच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मतदान करण्याची टीपही लिहिली आहे.

लग्नपत्रिकेचा वापर करुन उमेदवाराचा प्रचार करण्याचा  प्रकार इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग लग्नपत्रिकावर ही बारकाईने लक्ष ठेवणार आहे.  यासाठी उमेदवाराच्या खर्चाची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे,  असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.