Desh

निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना दणका; व्हीव्हीपॅटची ५० टक्के मोजणी होणार नाही

By PCB Author

May 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना दणका दिला आहे. व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के स्लिपांची मोजणी ईव्हीएमसोबत केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केल्याने व्हीव्हीपॅट स्लिपांच्या मोजणीत कोणताही फेरबदल होणार नाही.   

२२ विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के स्लिपांची मोजणी ईव्हीएमसोबत करण्याची मागणी केली होती. या संदर्भात निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या उपस्थितीत  घेतलेल्या बैठकीत आयोगाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही बदल न करण्याचा आणि आजपर्यंत व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी ज्या पध्दतीने केली जात होती,  त्या पध्दतीने  मोजणी करण्याचा निर्णयही आयोगाने यावेळी घेतला.

व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठी आणि ईव्हीएममधील मते जुळतात की नाही हे पडताळून पाहण्यासाठी   व्हीव्हीपॅटमधील किमान ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबत मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी  केली होती.  विरोधकांची ही मागणी मान्य केल्यास मतमोजणीला २ ते ३ दिवस लागू शकतात, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.