Maharashtra

निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी नाना पटोलेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

By PCB Author

May 26, 2019

नागपूर, दि. २६ (पीसीबी) –  नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेत अवाजवी हस्तक्षेप करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा नाना पटोले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रशांत पवार आणि काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह २० अज्ञात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झाला आहे. या सर्वांनी मतमोजणीच्या दिवशी थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर जात वाद घातला. या ठिकाणी उमेदवाराशिवाय इतरांना प्रवेश नसतो. तरीही तिथे जाऊन वाद घातला.

काँग्रेसच्या  निवडणूक प्रतिनिधींना आधीच निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची सर्व माहिती दिल्यानंतर देखील नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसह आत येऊन वाद घातल्यामुळे हे गुन्हे दाखल केले गेले आहे.

दुसरा गुन्हा नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेते अभिजित वंजारी आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात दाखल केला आहे.  या सर्वांनी निवडणूक अधिकारी व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोणती मशीन निवडावी याची प्रक्रिया करताना अवास्तव दबाव आणत मतमोजणीच्या ठिकाणी घोषणाबाजी केली होती.