निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदार लांडगेंकडून ‘रेड झोन’चे गाजर

0
220

रेडझोनचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा पुन्हा प्रयत्न

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – सन २०१४ पासून रेडझोनचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या व गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता उपभोगल्यानंतरही रेडझोनचा प्रश्न सोडवू न शकलेल्या आमदार महेश लांडगे यांना अचानक रेडझोनच्या प्रश्नाची आज आठवण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय स्टंटबाजी करण्यात माहिर असलेल्या भाजप नेत्यांनी रेडझोन बाधित नागरिकांच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.

याबाबत गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरालगत दिघी आणि देहूरोड येथे संरक्षण विभागाचे दारुगोळा डेपो आहेत. या डेपोमुळे दोन हजार यार्डपर्यंत रेडझोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हजारो घरे रेडझोनमुळे बाधित आहेत. रेडझोनची हद्द दोन हजार मीटरऐवजी पाचशे ते सातशे मीटरपर्यंत कमी करू असे आश्वासन भाजपाच्या अनेक नेत्यांनी सन २०१४ साली दिले होते. यानंतर २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीतही रेडझोनसह, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर यासह शेकडो आश्वासने दिली. मात्र त्यातील एकही आश्वासन भाजपाने व त्यांच्या नेत्यांनी पूर्ण केले नाही.

सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा खेळ मांडून त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दाखविणे हा भाजप नेत्यांचा नित्याचा प्रकार झाल्यामुळे शहरातील जनताही या मंडळींना वैतागली आहे. केंद्रात सलग आठ वर्षे, राज्यात पाच वर्षे आणि महापालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजप नेत्यांना रेडझोनचा प्रश्न सोडविता आला नाही. केवळ बैठकांची नौटंकी करण्याचाच प्रकार आतापर्यंत करण्यात आला. आता महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना रेडझोनच्या प्रश्नाची आठवण झाली आहे.

राजनाथ सिंह हे गेली तीन वर्षे केंद्रात संरक्षणमंत्री आहेत. या कालावधीत रेडझोनच्या प्रश्नावर साधे पत्र न लिहिणाऱ्या भाजपला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रेडझोनचा प्रश्न आठवला. महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील महापाविद्यालयातील पदवी प्रदान सोहळ्यानिमित्त राजनाथ सिंह हे आले असताना त्यांना निवेदन देण्याची उपरती झाली. त्यामुळे या प्रश्नाचे किती गांभिर्य भाजपा नेत्यांना आहे तेच यातून स्पष्ट होते. निवेदन देऊन केवळ नौटंकी करणे, त्यातून पत्रकबाजी करून प्रसिद्धी मिळविणे इतकाच हेतू असल्याचेच दिसून येत आहे. रेडझोनबाधित नागरिकही भाजपच्या या प्रकाराला ओळखून असल्यामुळे आमदार लांडगे यांनी रेडझोनच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याऐवजी आपली पक्षातील ताकद दाखवून हा प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही अजित गव्हाणे यांनी केले आहे.