Maharashtra

निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी शेतकऱ्यांना भोळे समजू नका – धनंजय मुंडे

By PCB Author

June 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळे समजू नका, अशी टीका ट्विट करून  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यांवर होते. यावेळी बोलताना शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता. या विधानांचा मुंडे यांनी खरपूस समाचार घेत  ठाकरे यांच्यावर  निशाणा साधला.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज (रविवार) उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते  जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.