निवडणुका जिंकणे दूर; पक्ष आपले भविष्यही ठरवू शकत नाही – सलमान खुर्शीद

0
317

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या सद्यपरिस्थितीवर मोठे वक्तव्य केले आहे. “सध्या पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसेच पक्ष सध्या पक्ष आपले भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थितीत पोहोचला आहे,” खळबळजनक वक्तव्य सलमान खुर्शीद यांनी केले.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्याने पक्षाला संकटांचा सामना करावा लागत असल्याचे खुर्शीद म्हणाले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. “लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी घाईगडबडीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावावर विचार केला जाणार असल्याचेही,” ते म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचे एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठे संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले. “सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत आहेत. केवळ अध्यक्षपद रिक्त होते म्हणून त्या या पदावर असल्याची त्यांनी धारणा आहे. परंतु असे असू नये अशी मी आशा करतो,” असे खुर्शीद म्हणाले.