निवडणुका जवळ आल्यावर भाजप-शिवसेनेला राम आठवतो- अजित पवार

0
776

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – निवडणुका जवळ आल्यावर भारतीय जनता पक्षासह शिवसेनेच्या नेत्यांना राम आठवतो, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. भाजप-सेनेच्या युतीबाबत काहीही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणारच आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

कामगार परिषदाच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या तोंडावर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, योगेश बहल, नाना काटे, विशाल कलाटे, प्रशांत शितोळे, फजल शेख या वेळी उपस्थित होते.

कायदा-सुव्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, पवना थेट जलवाहिनी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी, निविदा प्रक्रियेतील ‘रिंग’ या शहरातील प्रश्नांचा आढावा पवार यांनी घेतला. राज्यातील सरकार अपयशी ठरल्याचा दावा केला. ते म्हणाले, शिवसेना ‘भाजप’वर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतेय, तरी भाजपचे नेते शांत आहेत. त्यांना प्रत्युत्तर दिले जात नाही किंवा कारवाईदेखील होत नाही. याचे कारण म्हणजे शिवसेनेशी युती केल्याशिवाय सत्ता मिळविणे शक्य नसल्याची भीती भाजपला वाटते. त्यामुळेच ते सेनेच्या विरोधात बोलायला धजावत नाही. निवडणुका जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला जातो. समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न होतात.’