निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का ? रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला संताप

0
448

पुणे,दि.११(पीसीबी) – साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे.

दरम्यान ही घटना अत्यंत संतापजनक आहे. तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे. निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का? घटना घडल्यानंतर आपण चार दिवस चर्चा करतो आणि नंतर गप्प बसतो. समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसावी, कायद्याचे राज्य असले तरी माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापादांचा नायनाट व्हावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने एकत्र यावे. कालची घटना अमानवी आहे. आरोपींना शिक्षा होईल. पण तरीही या घटना थांबणार आहेत का? वाढती विकृती आपण थांबवणार आहोत की नाही?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला. वाढती पोर्नोग्राफी थांबवण्यासाठी आमच्या खासदाराने केंद्र सरकारला पत्रं लिहिलं असून त्यावर कार्यवाही होण्याची अपेक्षाही चाकणकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली. राजावाडी रुग्णालय परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.