निरंकारी माता सविंदर हरदेवजी यांना दिल्लीत भावपूर्ण निरोप

1284

भोसरी, दि. १० (पीसीबी) –  संत निरंकारी मिशनच्या तत्कालीन प्रमुख निरंकारी माता सविंदर हरदेवजी महाराज यांना बुधवारी (दि. ८) लाखों निरंकारी भक्तांकडून साश्रू नयनांनी भावपूर्ण अंतिम निरोप देण्यात आला. त्यांची अंत्ययात्रा बुराडी रोड, दिल्ली स्थित मैदान नं. ८ येथून सुरु झाली होती. निगम बोध घाट येथील सीएनजी स्मशानभूमीत पोचली. त्यानंतर विधिवतपणे सीएनजी दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाखो भक्तगण या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने या अंतिम यात्रेने एका शोभायात्रेचे रुप धारण केले होते. माताजींचे पार्थिव शरीर फूलांनी सजविलेल्या एका खुल्या वाहनावर ठेवण्यात आले होते आणि त्या वाहनावर मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी आणि त्यांच्या दोन्ही बहीणी समताजी व रेणूकाजी तसेच गुरु परिवारातील अन्य सदस्य बसले होते.

साधारण १० किलो मीटर लांब अशी ही अंतिम यात्रा निरंकारी मिशनच्या परंपरेनुसार काढण्यात आली होती. त्यामध्ये सर्वात पुढे भारत व विदेशातील मिशनचे सेवादल सदस्य आपापल्या गणवेषांमध्ये आणि त्यांच्या पाठोपाठ मिशनचे देश-विदेशातील प्रबंधक व प्रचारक दुपट्टा परिधान करुन अंत्ययात्रेमध्ये चालत हाते. अंत्ययात्रेमध्ये देश-विदेशातून आलेल्या लाखों निरंकारी भक्त दाखल झाले होते. ही अंत्ययात्रा ज्या मार्गावरुन गेली त्या मार्गाच्या दुतर्फा हजारो भाविक भक्तगण उभे राहून माता सविंदर हरदेवजी यांच्या प्रति आपल्या श्रद्धा भावना व्यक्त केल्या.