नितीन गडकरींची मोठी घोषणा; ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द  

0
1057

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन चालविणे परवाना देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाहन चालविण्याचा (ड्रायव्हिंग) व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी  किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण  होणे बंधनकारक होते. पण आता ही अट काढून टाकण्याचा दूरगामी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वाहन चालक बनण्यासाठी शिक्षणापेक्षा कौशल्याला  महत्त्व दिले जाणार आहे. देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर  नितीन गडकरी यांनी  हा  मोठा निर्णय   घेतला आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ या कायद्यात सुधारणा करण्यासाठी  थेट अध्यादेश काढण्यात येणार आहे.  कायद्यातील आठव्या कलमात याद्वारे दुरुस्ती केली जाईल, असे  मंत्रालयाने म्हटले आहे.  ही दुरुस्ती झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी किमान आठवी उत्तीर्ण होण्याची अट रद्द होईल. त्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांतील कुशल चालकांना त्याचा लाभ होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे कुशल चालक असलेल्या तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

रस्ते व महामार्ग क्षेत्रात सध्या २२ लाख चालकांची कमतरता आहे. ग्रामीण भागात अनेक तरुण परिस्थितीमुळे ड्रायव्हिंगचे औपचारिक शिक्षण घेऊ शकत नाहीत.  मात्र, ते साक्षर व कुशल चालक आहेत. अलीकडेच याबाबत हरियाना सरकारने  सूचना केली होती.  ही सुचना  केंद्र सरकारने स्वीकरली आहे.  वाहन  चालक परवाना काढण्यासाठी आठवीपर्यंतची अट काढल्याने केवळ शिक्षण कमी म्हणून एखाद्याचा रोजगार जाणार नाही.