Pimpri

निगडी, वाकड, एमआयडीसी भोसरी मध्ये तीन अपघात; सातजण जखमी

By PCB Author

September 24, 2021

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – निगडी, वाकड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अपघात झाले आहेत. यामध्ये सातजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दारूच्या नशेत वाहन चालवून एका कारला जोरात धडक दिली. त्यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालक महिलेला मुकामार लागला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) दुपारी पाच वाजताच्या सुमारास हुतात्मा चौक, आकुर्डी येथे घडली. वृषाली योगेश भालेराव (वय 41, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक नारायण दिवाकर वैद्य (वय 40, रा. रावेत, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोपेड दुचाकीला स्प्लेंडर दुचाकीने धडक दिली. यामध्ये मोपेड दुचाकी चालक जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 22) रात्री दहा वाजताच्या सुमारास आठवण हॉटेल समोर, काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी निलेश आनंद राठोड (वय 39, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्प्लेंडर दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवळी माथा ते क्वालिटी सर्कलच्या मध्ये भोसरी टेल्को रोडवर एका रिक्षाने दुस-या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुस-या रिक्षात बसलेले पाचजण जखमी झाले. तर एकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामराज श्रीरामप्रसाद पटेल (वय 50, रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.