निगडी माहेरहून पंधरा लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

591

निगडी, दि. १७ (पीसीबी) – दुचाकी आणि घर घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन येण्यासाठी पत्नीकडे तगादा लावून तिचा छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेकराईनगर हडपसर आणि यमुनानगर निगडी येथे १० सप्टेंबर २०१७ ते १२ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडली.

याप्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार,पती श्रीप्रसाद ज्ञानदेव शेंडगे (वय २५, रा. यमुनानगर, निगडी), ज्ञानदेव नामदेव शेंडगे (वय ५४), अलका ज्ञानदेव शेंडगे (वय ४५, दोघे रा. राजुरी, ता. पुरंदर), प्रशांत ज्ञानदेव शेंडगे (वय २८), माधुरी प्रशांत शेंडगे (वय २६, दोघे रा. बेकराईनगर, हडपसर) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला आणि आरोपी श्रीप्रसाद यांचा सप्टेंबर २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नामध्ये महिलेच्या वडिलांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. तो हुंडा मुलीच्या वडिलांनी दिला नाही. त्यामुळे आरोपींनी विवाहितेकडे हुंड्यासाठी तगादा लावला होता. तसेच नवीन घर आणि दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये आणण्याची मागणी करून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.