Pimpri

निगडी, प्राधिकरणात लसीकरण केंद्र सुरु करा; शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांची मागणी

By PCB Author

March 16, 2021

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. प्राधिकरणात लसीकरणाची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना रुपीनगरला किंवा मोहननगरला जावे लागते. त्यासाठी प्राधिकरणातील ‘ओपीडी’त लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, दुस-या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. निगडी, प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, तेथे लसीकरण केंद्र नाही. त्यामुळे ज्येष्ठांना रुपीनगरला किंवा मोहननगरला लसीकरणासाठी जावे लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना लांब जाण्याचा त्रास होत आहे. लसीकरण केंद्र लांब असल्याने नागरिक लस घेण्यासाठी टाळण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्राधिकरणात लसीकरण केंद्र चालू करावे. प्राधिकरण एलआयजी ‘ओपीडी’त केंद्र कार्यान्वित करावे. अथवा प्राधिकरण परिसरातील खासगी असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल, स्टर्लिंग हॉस्पिटलमध्येही केंद्र केले तरी चालेल. महापालिकेतर्फे प्राधिकरण परिसरात लसीकरण केंद्र सुरु करावे. जेणेकरुन ज्येष्ठांना लस घेणे सुकर होईल, अशी आग्रही मागणी नगरसेवक गावडे यांनी केली आहे.