निगडी प्राधिकरणात पुन्हा टोळीयुध्द; रावण आणि तांडव टोळीतील सदस्य भिडले

0
3823

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – दांडिया खेळताना झालेल्या भांडणाचा राग मनात पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सतर्क असलेली रावण टोळी आणि तांडव टोळीतील दोन टोळ्यांनी एकामेकांवर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्हीकडील दोन तरुणावर चाकुचे वार होऊन ते जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.१९) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे घडली.

याप्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी परस्परविरोधी तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार, रावण टोळीतील रोहन राजू चंदेलिया (वय २०, रा. जाधव वस्ती रावेत), ऋषिकेश गायकवाड (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), राहुल लांडगे आणि संशयीत तांडव टोळीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणासह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत तांडव टोळीतील अल्पवयीन तरुण हा प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन कॉलेज येथे शिक्षक घेतो. बुधवारी सकाळी रावण टोळीतील सदस्य रोहन, राहुल आणि ऋषिकेश हे कॉलेजवळ फिरत होते. यावेळी  ऋषिकेश याने रोहन याला सांगितले कि, तांडव टोळीतील अल्पवयीन आरोपीने मला दसऱ्याच्या वेळेस दांडीया खेळताना मारले होते. यावर या तिघा आरोपींनी अल्पवयीन तरुणाला जबर मारहाण करत त्याच्या बरगडीवर चाकूने वार केला. यावेळी अल्पवयीनाचे साथीदारदेखील तेथे पोहचले त्यांनी देखील रोहन याच्या डोक्यात चाकूने वार करुन जखमी केले. याप्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी एकमेकांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर पोलीसांनी रावण टोळीतील रोहन चंदेलिया याला अटक केली असून संशयीत तांडव टोळीतील अल्पवयीन तरुणाला ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.