निगडी ते रावेत रेल्वे पुलाचे बांधकाम रखडले, अधिकाऱ्याच्या पगारातून भरपाई वसूल करण्याची मागणी

0
450

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी ते रावेत उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून या उड्डाणपुलासाठी जागा ताब्यात नसताना उड्डाणपुलाचे काम सुरू करून पिंपरी महानगरपालिकेचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे.

यादव पुढे म्हणाले की” भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक रावेत या बीआरटी मार्गावर 45 मीटर रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू केले.या कामाची मुदत दोन वर्षे संपली आहे.रेल्वे उड्डाणपूल ज्या ठिकाणी उतरतो त्याठिकाची जागा पालिकेच्या ताब्यात नाही, तरीही या उड्डाणपुलाची टेंडर प्रक्रिया,वर्क ऑर्डर व प्रत्यक्ष काम करून पालिकेचे करोडो रुपये यासाठी खर्च केले आहेत आणि दोन वर्षांपासून काम थांबलेले आहे.

अधिकारी,कर्मचारी यांचा महत्वाचा वेळ!

रावेत ते निगडी या रस्त्याचे काम थांबल्याने कामासाठी महापालिकेचा भरमसाठ पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी यांचा वेळ वाया जात आहे, यासाठी पालिकेच्या तिजोरीतूनही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले असताना त्याचा शहराला कसलाही फायदा होत नाही. उलट उड्डाणपुलाचे काम थांबल्याने गैरसोय होणार आहे!

वाढीव खर्चाचे काय?

उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे थांबल्याने कधी सुरू होईल,कोर्टाकडून कधी निकाल लागेल हे आज कोणीही सांगू शकत नाही.ज्यावेळी हे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल त्यावेळी कित्येक कोटी रुपयांचा वाढीव खर्च उड्डाणपूल बांधणाऱ्या ठेकेदाराला द्यावा लागेल त्याशिवाय तो काम करणार नाही,मग हे वाढीव खर्चाचे काय? पालिकेच्या तिजोरीवर पडणार भार कोण सहन करणार?त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे की याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करावी! अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे नितीन यादव यांनी माझा आवाज शी बोलताना सांगितले.