निगडी ते दापोडी मार्गावर पीएमपीचे बसचालक बेदरकार; सीमा सावळेंनी केले कॅमेऱ्यात कैद, महापालिकेचे पीएमपीला खरमरीत पत्र

0
2187

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – निगडी ते दापोडी या रस्त्यांवर बीआरटीएस बससाठी स्वतंत्र मार्गिका तयार करून देखील पीएमपीएमएल बसचालक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. बसथांब्यावर बस व्यवस्थित उभे न करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून झेब्रा क्रॉसिंगवर बस उभे करणे, सिग्नल लागलेला असताना देखील बस पळविणे, असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. पर्यायाने निगडी-दापोडी मार्गातील प्रमुख चौकात वाहतूककोंडी नित्याचीच बाब बनली आहे. पीएमपीएमएल बसचालकांचा हा बेदरकार आणि उद्दामपणा पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. सर्व फोटो महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले. त्यानंतर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने पीएमपीएमएलला खरमरीत पत्र पाठवून पीएमपीएमएल बसचालकांना सिग्नल व वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सक्त सूचना देण्यास सांगितले आहे.

महापालिकेने निगडी ते दापोडी या रस्त्यांवर पीएमपीएमएलच्या बससाठी सात-आठ वर्षांपूर्वीच स्वतंत्र बीआरटीएस मार्गिका तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या मार्गामुळे वाहतूक सुरळित होण्याऐवजी अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याने हा स्वतंत्र मार्ग वादात सापडला. अनेकांच्या आक्षेपानंतर या स्वतंत्र मार्गाचे ऑडिट करून मार्गात बदलही करण्यात आले. तरीही हा मार्ग सुरक्षित न वाटल्याने त्याचा वाद उच्च न्यायालयापर्यंत पोचला. उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर दोन महिन्यांसाठी बीआरटीएसची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे.

त्यानुसार महापालिकेने या बीआरटीएस मार्गावर २४ ऑगस्ट २०१८ पासून पीएमपीएमएलची बससेवा सुरू केली आहे. परंतु, पीएमपीएमएलचे बेदरकार व उद्दाम चालक या स्वतंत्र बीआरटीएस मार्ग असूनही लवकरच जाण्याच्या उद्देशाने वाहतूक नियमांची ऐसीतैसी करत बस पळवत आहेत. बसथांब्यांवर बस व्यवस्थित उभे केले जात नाहीत. झेब्रा क्रॉसिंगवर बस उभे केले जातात. सिग्नल लागलेला असताना देखील बस पळवतात. त्यामुळे निगडी ते दापोडी या रस्त्यांवरील सर्व प्रमुख चौकांत वाहतूककोंडीला आमंत्रण मिळत आहे. तसेच बसचालकांच्या या उद्दामपणाचा प्रवाशांनाही फटका सहन करावा लागत आहे. बसचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.

निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर पीएमपीएमएल बसचालकांचा बेदरकार आणि उद्दामपणा कसा चालतो, हे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सिग्नल लागलेला असताना पीएमपीएमएलचा बसचालक बस पळवत नेताना त्यांनी फोटो काढले. हे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले. बसचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसतील, तर निगडी ते दापोडी मार्गावर स्वतंत्र बीआरटीएस मार्गिका सुरू करून काय उपयोग झाला?, असा सवाल सावळे यांनी आयुक्तांना केला.

आयुक्त हर्डीकर यांनी त्याची योग्य दखल घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक आणि निगडी आगारप्रमुख खरमरीत पत्र पाठविले आहे. पीएमपीएमएलचे बसचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर बस नेणाऱ्या सर्व बसचालकांना सिग्नल व वाहतुकीचे नियम पालन करणेबाबत सक्त सूचना द्यावेत, असे महापालिकेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राची दखल घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने बसचालकांना सक्त ताकीद द्यावी आणि बसचालकांनी सिग्नल व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावेत, यासाठी गणरायाने त्यांना सुबुद्धी देवो, अशी भावना शहरातील सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.