निगडी कोम्बिंग ऑपरेशन: धरायला गेले १२९ हाती लागले ५६; पोलिसांमधूनच कारवाईची माहिती गुन्हेगारांना पुरवल्याचा संशय

0
2233

निगडी, दि. ८ (पीसीबी) – निगडीतील ओटा स्किम परिसरात आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन एकूण ५६ सराईतांना ताब्यात घेतले. मात्र १२९ गुन्हेगारांची यादी तयार केली असताना पोलीसांच्या हाती फक्त ५६ गुन्हेगारच कसे लागले या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, तसेच बारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी असे ३०९ पोलीस आणि ५५ अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली.

निगडी ओटास्किम हा परिसर गुन्हेगारांचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैदधंदे असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वावरत असतात. यांचा स्थानिक नागरिकांसह शहर परिसरातील नागरिकांना त्रास होते. या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना चाप बसावा आणि गुन्हेगारी कारवायांवर आळा बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही महिन्यांच्या विश्रांती नंतर का होईना पोलीसांनी जाग आली आहे. पोलिसांनी देहुरोडनंतर निगडी ओटास्किम येथे केलेले हे दुसरे कोम्बिंग ऑपरेशन आहे. या कारवाई मुळे निगडी ओटास्किम येथील स्थानिक नागरिकांनी काही वेळेसाठी का होईना सुटकेचा श्वास घेतला.

मुख्यत: ओटा स्कीम परिसरातील १२९ गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली होती. मात्र त्यांच्या हाती फक्त ५६ गुन्हेगारच कसे लागले, यावर शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे बाकीचे ७३ गुन्हेगार कसे फरार झाले. आयुक्तालयातील एकूण ३०९ पोलीस आणि ५५ अधिकाऱ्यांची यंत्रणा या कारवाईत असताना ७३ आरोपींना न पकडण्याचे गणीत पचणारे नाही. त्यांना कारवाई बाबत पहिलीच माहिती कळाली होती का? तसेच आयुक्तांनी आदेश दिल्यावरच कारवाई करणार का? अशा विविध प्रश्नांची चर्चा सध्या निगडी परिसरात रंगली आहे.