निगडीत मित्राला सल्ला देणे पडले महागात; मित्रासह मित्राच्या नातेवाईकांनी कोयत्याने केले वार

0
1180

निगडी, दि. ७ (पीसीबी) – मित्राला दारु पिऊ नकोस, चांगला वागत जा असा सल्ला दिल्याने मित्राच्या नातेवाईकांनी मित्रावरच कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.५) सायंकाळी सव्वादहाच्या सुमारास चिंचवड अजंठानगर येथील अशोका हौसिंग सोसायटीच्या बिल्डींगखाली घडली.

प्रकाश महादेव ठोसर (वय २५, रा. अशोका हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं.१३, अजंठानगर, चिंचवड) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुदास गायकवाड, विनोद गायकवाड, सावित्रा गायकवाड आणि गुरुदास गायकवाड त्यांची पत्नी(नाव समजू शकले नाही) आणि राजू कांबळे नामक इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रकाश ठोसर आणि आरोपी गुरुदास हे एकमेकांच्या ओळखीचे असून चांगले मित्र आहेत. गुरुदास हा वारंवार दारु पिऊन भांडण करतो म्हणून प्रकाश याने गुरुदास याला दारु पिऊ नकोस, चांगला वागत जा असा सल्ला दिला. यावर रागावलेल्या गुरुदाससह त्यांच्या कुटूंबीयांनी प्रकाशवर जोरदार हल्ला चडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करत आहेत.