Chinchwad

निगडीत पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By PCB Author

August 27, 2018

निगडी, दि. २७ (पीसीबी) – रस्ता ओलांडण्यासाठी दुचाकी घेऊन उभे असलेल्या एका ५५ वर्षीय दुचाकीस्वराला पीएमपी बस चालकाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२६) दुपारी तीनच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकात असलेल्या पीएमपी बस डेपो समोरील रस्त्यावर घडली.

बंडु बाबासाहेब शिंदे (वय ५५, रा. कर्मयोग हौसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पीएमपी बसचालक तानाजी दत्तात्रय नलावडे (वय २७, रा. तापकीर चौक, थेरगाव) याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार तानाजी नलावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी बंडु शिंदे हे त्यांची दुचाकी क्र. (एमएच/१४/ऐजी/१६४३) घेऊन निगडी भक्ती-शक्ती चौकात असलेल्या पीएमपी बसच्या डेपो समोरील रस्ता ओलांडण्यसाठी उभे होते. यावेळी पीएमपी बस क्र.(एमएच/१४/सीडब्ल्यू/२१३१) वरील चालक तानाजी नलावडे याने त्याच्या ताब्यातील बस वेगाने चालवून शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे शिंदे दुचाकीसह खाली पडले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये शिंदे यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. निगडी पोलिस तपास करत आहेत.