निगडीत दोघा भावांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू; एक गंभीर

0
874

निगडी, दि. ७ (पीसीबी) – निगडीतील मिलींदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोघा भावांवर आज (रविवार) पहाटेच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारुन जखमी केले. यातील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

तुकाराम गुराप्पा शिंदे (वय २२, रा. मिलिंदनगर, निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ सुरेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास निगडी पोलिसांना निगडीतील मिलिंदनगर येथे दोघा भावांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुकाराम आणि सुरेश या दोघा भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी तुकाराम याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) रात्री शिंदे बंदू ते राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत झोपले होतो. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्या दोघांवर हल्ला करुन सिमेंटच्या गट्टूने डोक्यात वार केले आणि पसार झाले. खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.