निगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी

0
1013

भोसरी दि.१३ (पीसीबी) – निगडी येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्याच्या पदपथांचा शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला आहे. या कुटुंबांनी उघड्यावरच आपला संसार मांडला आहे. त्यामुळे स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. या भिक्षुकांना तत्काळ हटविण्यात यावे व मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांची दुसऱ्या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात किशोर हातागळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “निगडी येथील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे उड्डाणपुल हा निगडी टिळक चौकातील महत्वाचा केंद्रबिंदू आहे. शेजारीच निगडी बसस्थानक आहे. येथून पुणे शहरात तसेच निगडी ते भोसरी मार्गे आळंदी अशा वाहतूक सेवा चालतात. तसेच निगडी- मुंबई महामार्ग असल्यामुळे येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याच चौकातून प्राधिकरण-रावेत आणि भोसरी एमआयडीसी, तळवडे आयटी पार्ककडे जाण्याचा मार्ग आहे. यामुळे हजारो नागरिक या भागातून ये-जा करतात. असे असताना मुख्य रस्त्यावरच शेकडो भिक्षुकांनी ताबा मारला आहे. पदपथावर उघड्यावर संसार मांडला असून शहरवासीयांना तेथून जाताना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी ताबा घेतल्याने स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. त्यामुळे या भिक्षुकांना तेथून तत्काळ हटविण्यात यावे. तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांची दुसरीकडे तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”