निगडीतील अमरधाम स्मशानभूमीच्या दुरूस्तीची आयुक्तांकडे मागणी

0
943

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात काळभोर यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “निगडीतील अमरधाम स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतींना भगदाड पडले आहे. स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या ठिकाणी चौथऱ्यातील खड्ड्याचे ब्लॉक विखुरले आहेत. त्यामुळे मयताला अग्नी देण्यासाठी चौथऱ्यावर टाकलेली लाकडे खाली पडतात. या चौथऱ्याच्या संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. स्मशानभूमीतील स्वच्छतागृहांचे भांडे फुटलेले आहेत. स्वच्छता नसल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. विद्युतदाहिनीतील चिमणी जीर्ण झाली आहे. ही विद्युतदाहिनी अनेकदा बंद अवस्थेत असते. स्मशानभूमीच्या कमानीवरील वैकुंठशिल्प देखील जीर्ण झाले आहे. या सर्व बाबीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन या स्मशानभूमीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”