Maharashtra

 ‘ना पार्थ, ना शरद पवार’,आमच्या घरातून मीच लोकसभा लढवणार – सुप्रिया सुळे

By PCB Author

October 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) –  आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे, हे पक्षासाठी चांगले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच ‘ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असेही सुप्रिया सुळे  यांनी स्पष्ट केले आहे. 

कोणी कोणाला विरोध केला ही माझ्याकडे माहिती नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्या कानावर आली नाही. आम्ही तिकिट  कोणावर लादणार नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन  त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. हा पहिला टप्पा झाला. अजून बैठका बाकी आहेत. अनेक मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारबद्दलची चर्चा फक्त  प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आहे. घरात किंवा पक्षात पार्थबद्दलची चर्चा झालेली नाही. सर्वच जागा कुटुंबातील लोकांनी घेतल्या, तर कार्यकर्त्यांना कधी संधी कधी मिळणार? असे पक्षाध्यक्ष शरद पवारांनी  म्हटले आहे.  त्यामुळे लोकसभेला आमच्या घरातून  मी एकटी इच्छुक आहे, असे सुळे म्हणाल्या.