नाश्ता बनवून दिला नाही म्हणून भाचीने केला मावशीचा खून

0
747

ठाणे, दि. ८ (पीसीबी) – नाश्ता बनवून दिला नाही म्हणून सख्या भाचीने स्वत:च्या अंध मावशीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.६) दुपारच्या सुमारास ठाण्यातील विनायक भवन सोसायटीत घडली.

शोभा गणेश कुलकर्णी (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भाची स्वप्ना सुधीर कुलकर्णी (वय ३९) हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मृत शोभा या अविवाहित होत्या. तसेच अंध असल्या तरी घरातील सर्व काम करत होत्या. विनायक भवन सोसायटीतील घर हे त्यांच्याच नावावर आहे. सख्या बहिणीची मुलगी स्वप्ना हिच्यासोबत त्या राहत होत्या. शनिवारी दुपारी बेशुद्ध अवस्थेत शोभा यांना सिव्हिल रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शोभा यांच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता मृतदेहावर १५ जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. नंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शोभा राहत असलेल्या घराची बारकाईने तपासणी केली. जमिनीवरील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब पुढे आली. तसेच भिंतीवरील रक्ताचे डागही पुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पोलिसांनी स्वप्ना हिच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक बाब पुढे आली. सकाळी शोभा यांनी नाश्ता तयार केला नाही. परिणामी बाचाबाची झाली आणि स्वप्नाचा राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात तिने शोभावर चाकूने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ठाणे पोलिसांनी स्वप्नाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.