Maharashtra

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

By PCB Author

November 21, 2018

नाशिक, दि. २१ (पीसीबी) – करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून  प्रशासनात ओळखले जाणारे नाशिक महापालिकेचे आयुक्त  तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी  राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे  अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश माझ्यापर्यंत आलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी  दिली आहे. आज (बुधवारी)  दिवसभर तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सोशल मीडियावर  रंगली होती. मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा शहरभर सुरू होती, मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळत नव्हता.

तुकाराम मुंढे यांच्या करड्या आणि नियमांवर बोट ठेवून काम करण्याच्या पध्दतीमुळे  नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपची डोकेदुखी झाली  होती.  काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपने केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत  मुंडे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश  दिले होते. मात्र, मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना वाढीस लागली होती.