नाव विचारल्याने मोशी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून शिवदुर्ग संस्थेच्या सदस्याला मारहाण

2424

मोशी, दि. १४ (पीसीबी) – नाव आणि पत्ता विचारला म्हणून शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्याला मोशी टोलनाक्यावरील १४ ते १५ कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.१२) दुपारी पावनेबाराच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोड वरील मोशी टोलनाक्यावर घडली.

संतोष गोविंद गोलांडे (वय ४६, रा. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्याचे नाव आहे. त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोशी टोलनाक्यावरील कर्मचारी आकाश शशीकांत तावडे (रा. संजय गांधीनगर, मोशी), अजय दत्तू झाल्टे (रा. बोराटे वस्ती, मोशी), शिवम दत्तात्रय हापसे (रा. कुरुळी हापसेवस्ती, ता. खेड), चांगदेव पोपट जानकर (रा. संजय गांधीनगर, मोशी), प्रशांत सुनिल पोतदार (रा. गायकवाड वस्ती, मोशी टोल नाक्याजवळ, मोशी) आणि इतर ९ ते १० अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव आणि पत्ता विचारल्याचा राग आल्याने मोशी टोलनाक्यावरील कर्मचारी आकाश, अजय, शिवम, चांगदेव, प्रशांत आणि त्यांचे इतर ९ ते १० साथीदारांनी मिळून सोमवारी दुपारी पावनेबाराच्या सुमारास शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य संतोष गोलांडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक तोडकर तपास करत आहेत.