‘नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी’

0
271

रत्नागिरी, दि. ३० (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे आणि गुहागर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी या भास्कर जाधवांच्या मागणीमुळे सुनील तटकरे आणि जाधव यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आलाय. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्यानंतर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? असा सवाल भास्कर जाधव यांनी केलाय.

केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर हल्ला चढवलाय. सुनील तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन केल्याच्या नावाखाली लोकांच्या हजारो एकर जमीनी लाटल्याचे आरोप आहे. 10 ते 15 हजार कोटींची बेहिशेबी माया गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहेत. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा टोला जाधव यांनी लगावलाय. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण, जाणीव आणि नीतिमत्ता लागते आणि सुनिल तटकरे यांच्याकडे यातलं काहीच नाही. तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं माहीत नाही, अशा शब्दात जाधव यांनी तटकरेंवर हल्ला चढवलाय.

सुनिल तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. पण माझ्या कोणत्याही विजयात सुनील तटकरे यांचं योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी अनेक ठिकाणी काड्या केल्या. त्यांना मदत करणाऱ्यांचंच तटकरे यांनी कायम वाटोळं केलं, असा आरोप करताना जाधव यांनी दिवंगत आमदार माणिकराव जगताप, बॅरिस्टर अंतुले यांचं उदाहरण दिलं. तटकरे स्वतःला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा फाऊंडर मेंबर म्हणवतात, पण ते सत्य नाही. सुनील तटकरे हे मूळचे कॉग्रेसचे आहेत, असंही जाधव यांनी म्हटलंय.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुनही जाधव आक्रमक
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीही भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला होता. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची 2024 साली रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनील तटकरे यांनी द्यावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी तटकरे यांना देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर कुणबी समाज्यावर सुनील तटकरे यांचे प्रेम आहे की आपल्या घराण्याकरिता प्रत्येक गोष्ट करत आलेत हे सिद्ध करण्याची ही नामी संधी असल्याचं विधान करत जोरदार टोलाही लगावला होता.