नालासोपारा स्फोटक प्रकरणी घाटकोपरमधून आणखी एकाला अटक

0
863

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमधून ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. काल (शुक्रवारी) रात्रीच्या सुमारास या तरुणाला अटक केली असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. त्याला आज (शनिवारी) दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा व राज्याच्या अन्य भागांमधून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य आरोपींना अटक केली. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कट आखल्याची माहिती पुढे आली. या सर्व आरोपींचा सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप  केला जात आहे.

एटीएसच्या तपासात या प्रकरणात घाटकोपर येथील ३० वर्षांच्या तरुणाचा सहभाग असल्याचे समोर आले. या तरुणाला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. त्याला आज (शनिवारी) दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा तरुण कोण आहे, त्याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग काय याचा तपशील अद्याप पोलिसांनी दिलेला नाही. पोलिस तपास करत आहेत.