Pune

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी धरपकड सुरुच; राज्यभरातून १२ जण ताब्यात

By PCB Author

August 11, 2018

पुणे, दि. ११ (पीसीबी) – नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे. अटक झालेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे.

आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघावर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली. सोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. हे बॉम्ब कमी तीव्रतेचे असून त्यामुळे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण हे तरुण घेत होते का, या दृष्टीनेही तपास होत आहे. हे बॉम्ब, स्फोटके आणि अन्य वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे एटीएसचे म्हणणे आहे.