नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? – सचिन सावंत

0
142

मुंबई,दि.२४(पीसीबी) – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? असा खोचक सवाल करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आणि केंद्र सरकारवर टिका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला आम्ही दुर्लक्ष करु देणार नाही. एका 59 ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत आहे. याचवेळी कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाणला 1200 किलो गांजासह अटक करण्यात आली. याकडे एनसीबी ढुंकुंनही पाहायला तयार नाही.” असं सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान “कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे. या बोयोपिकमध्ये मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे,” अशीही माहिती सचिन सावंत यांनी दिली.