Maharashtra

नारायण राणे यांची मेडिकल करण्याची गरज

By PCB Author

October 27, 2020

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – ठाकरे आणि राणे यांच्यातील आरोप- प्रत्योरापाने राजकारण तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा भाजपा खासदार नारायण राणे यांनी सडकून समाचार घेतला. मात्र नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला आता शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख नारायण राणेंनी करणं गैर आहे. एवढंच नाही तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे असंही शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे. तर नारायण राणे यांची मेडिकल तपासणी करण्याची गरज असल्याचा खोचक टोला दादा भुसे यांनी लगावला आहे.

“नारायण राणे यांचा इतिहास आणि भूगोल सगळ्यांनाच माहित आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पत्रकार परिषदेतले हावभाव आणि बोलणं बघता त्यांची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये भरपूर अंतर आहे तरीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकलं पाहिजे” असंही भुसे यांनी म्हटलं आहे.

तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा नाही. महाराष्ट्राला एक राजकीय इतिहास आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. पण १५ आमदार निवडून येणार किंवा सरकार पडणार हे बोललं जात होतं. आजच्या नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र हेच ठरवेल की उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभं रहायचं असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.